कुडाळ हायस्कूल, कुडाळ शताब्दी महोस्तव १९२०- २०२०

शनिवार दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी कुडाळ हायस्कूलच्या ४४ विद्यार्थ्यांनी दोन मार्गदर्शक शिक्षकांसह पणजी, गोवा येथे भरलेल्या इंटरनॅशनल सायन्स,टेक्नॉलॉजी आणि इंडस्ट्री एक्स्पोला भेट दिली.

या भेटीत विद्यार्थ्यानी प्रथम इस्रोने बनवलेल्या प्रदर्शन वाहनाला भेट दिली. विविध याने, उपग्रह, उपग्रह प्रक्षेपण याने यांची माहिती तेथे उपस्थित शास्त्रज्ञांकडून विद्यार्थ्यानी करून घेतली. नंतर मुख्य प्रदर्शन तंबूमध्ये अणुविज्ञान, रेडिओ तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, डि.आर.डि.ओ. ची प्रगती, विविध हस्तकला अशा विविधांगी विषयांची रेलचेल असलेले प्रदर्शन पाहताना विद्यार्थी तहानभूक हरपून गेले. तीन तास कधी निघून गेले हे कळलेच नाही. निसर्ग विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी तर या सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बसवून बॉयंट फोर्स ही संकल्पना सोप्या इंग्रजी भाषेत सुरेखरीत्या समजावून सांगीतली.

यानंतर प्रदर्शन स्थळापासून जवळच असलेल्या आयनॉक्स या चित्रपटगृहाकडे सर्वांची जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केली. अत्यंत चविष्ट जेवणाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सर्वांना भूक पण तशीच सपाटून लागली होती.

जेवणानंतर तेथील चित्रपटगृहात विज्ञान आणि तंत्रज्ञान आधारीत लघुपट दाखवले गेले. प्रत्येक लघुपटानंतर त्या लघुपटाच्या निर्मात्याच्या मुलाखती विद्यार्थ्यांना एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या होत्या.

या प्रदर्शनाचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि गोवा ओशनोग्राफीचे प्रिंन्सिपल सायंटिस्ट डॉ.श्री.नरसिंह ठाकूर तसेच प्रशालेच्या माजी शिक्षिका आणि आता गोवा येथील महाविद्यालयात प्राध्यापिका असणाऱ्या सौ. शुभांगी नाईक यांनी कक्षेबाहेर जावून मोलाची मदत केली. प्रशालेचे शिक्षक श्री. योगानंद सामंत आणि सौ. मनिषा कुबल यानी या प्रदर्शन भेटीचे संपूर्ण नियोजन आणि यशस्वी आयोजन केले.

Close Menu